परभणी : प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडणार असल्याचे भाकीत केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या भकीताचा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. ‘पहाटेचे सरकार कोसळल्यापासून भाजपाचे मानसिक संतुलन ढासळले आहे’ असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणीतील राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या २० नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाना पटोले यांनी भाजपावर चांगलाच हल्लाबोल चढवला.
नाना पटोले म्हणाले, भाजपाला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. त्यामुळे त्यांना सरकार बनवण्याचे रोज स्वप्न पडत आहेत. पहाटेचे सरकार झाल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सरकार पाडणार असल्याचे सांगून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे.
सरकार पडणार आहे. हे केवळ भाजपमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना थांबवण्यासाठी दिलेले आश्वासन असल्याचे सांगून नाना पटोले म्हणाले, भाजप हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. त्यांनी कोरोनाची औषधे वेळेवर दिली नाहीत. गुजरातमध्ये औषधांचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाराला सोडवण्यासाठी महाराष्ट्रातले नेते गेले.
पंतप्रधानांनी लोकसभेत कोरोना महाराष्ट्राने पसरवला, असे सांगत महाराष्ट्राची बदनामी केली आहे. काँग्रेस महाराष्ट्राची केलेली बातमी कधीच सहन करू शकत नाही, असेही नाना पटोले यांनी यावेळी नमूद केले.