कलकत्ता : वृत्तसंस्था
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजता निधन झाले. लतादीदींना सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लतादीदींच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर महाराष्ट्र सरकारने उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अशातच पश्चिम बंगाल सरकारने लतादीदींना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. बंगालमध्ये पुढील १५ दिवस सार्वजनिक ठिकाणे लतादीदींची गाणी वाजणार आहेत. तसेच उद्या पश्चिम बंगालमध्ये अर्ध्या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लतादीदींच्या अमूल्य योगदानासाठी अनोखी मानवंदना म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस सार्वजनिक ठिकाणी लतादीदींची गाणी वाजणार आहेत. यामध्ये सरकारी कार्यालये, कार्यालयांचे लिफ्ट, ट्रॅफिक सिग्नल अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी लतादीदींची गाणी लावली जाणार आहेत. त्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये उद्या अर्धा दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यानुसार उद्या अर्ध्या दिवसासाठी सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.
लतादीदींच्या निधनानंतर केंद्र सरकारनेही दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा दोन दिवसासाठी अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारनेही लतादीदी श्रद्धांजली वाहत दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारकडून उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.