Site icon Aapli Baramati News

पवार साहेबांचे सोलापूरवर विशेष प्रेम; सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या : जयंत पाटील

ह्याचा प्रसार करा

सोलापूर : प्रतिनिधी

पवार साहेबांचे सोलापूरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादीकडे द्या.  आम्ही सर्वजण महापालिकेत विशेष लक्ष घालू, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात झाली. ही यात्रा रात्री बारा वाजता सोलापूर शहरात पोहोचली. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी शहरातील भाजपाचे नेते बिज्जू प्रधाने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.

जयंत पाटील म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षातील नेते निघून चालले होते. परिस्थिती विचित्र होती. राष्ट्रवादीचा निकाल चांगला लागणार नसल्याचे प्रसारमाध्यमांवर बोलले जात होते. मात्र त्यावेळी पवार साहेबांनी राज्याचा झंझावती दौरा केला. प्रत्येक दौऱ्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पवार साहेबांची सोलापुरातही भव्य सभा झाली. येथील जनतेनेही पवार साहेबांना आणि आम्हाला साथ दिली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपाची राज्यातील सत्ता गेल्यापासून त्यांचे संतुलन ढासळले आहे. भाजपाकडून सर्व आमदार हाताळण्यात आले. राज्य सरकारवर विविध आरोप करण्यात आले. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र तसे काही होत नाही. अनेकांनी भाजप सोडण्याचा विचार केला आहे. सोलापुरातील अनेक कार्यकर्ते बिजू प्रधाने यांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील यात काही शंका नाही. पवार साहेबांचे सोलापूरवर विशेष प्रेम आहे. महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्यावर सर्वजण विशेष लक्ष घालू असे पाटील म्हणाले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version