Site icon Aapli Baramati News

परिवहन महामंडळ दाखल करणार एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एसटीचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरात संप चालू केला आहे. त्यामुळे राज्यातील बस सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. मात्र तरीही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे न घेण्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार आहे.

राज्यभरात विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे  बस सेवा बंद आहे. जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेतला जात नसल्यामुळे आता परिवहन महामंडळानेही कठोर पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली जाणार आहे.

दरम्यान, सोमवारी न्यायालयामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सुनावणी झाली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने तातडीने बैठक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आता पुन्हा न्यायालयामध्ये उद्या (दि. १० नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी बस चालकांना वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version