- पंडित बिरजू महाराज हे शास्त्रीय संगीत, कथ्थक नृत्य क्षेत्रातलं स्वतंत्र विद्यापीठ होते
- पंडितजींच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : प्रतिनिधी
“प्रसिद्ध कथ्थक नृत्यकलावंत, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज हे भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यक्षेत्रातलं स्वतंत्र विद्यापीठ होते. तरुण कलावंतांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या, त्यांच्यासाठी मार्गदर्शक, दीपस्तंभाचं काम केलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली.
कथ्थक नृत्यकलेला देशात, सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. कोट्यवधी रसिकांना मनमुराद आनंद दिला. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या पंडित बिरजू महाराजांना आदर, मान-सन्मान, लोकप्रियता मिळवून देण्याचं काम महाराष्ट्रानं सातत्यानं केलं. महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता बाळगणारे, पश्चिम बंगालला आई, महाराष्ट्राला वडील मानणारे ते कलावंत होते.
पंडितजींच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला आहे. पंडितजींच्या कुटुंबियांच्या, त्यांच्या कोट्यवधी रसिकांच्या दु:खात मी देखील सहभागी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.