दौंड : प्रतिनिधी
पोलिस खात्यामध्ये काम करताना निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणार नाही आणि दोषी सुटणार नाही, याबाबत नेहमी दक्ष राहायला हवे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
दौंड तालुक्यातील नानवीज येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयात गुरुवारी ४१ व्या प्रशिक्षण सत्राच्या दीक्षान्त संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समादेशक तानाजी चिखले, प्राचार्य संदीप आटोळे उपस्थित होते.
‘खाकी गणवेश आपण स्वत: च्या हिमतीने कमावला आहे हे नवप्रविष्ठांनी सदैव लक्षात ठेवून जनतेची सेवा करणे आपले कर्तव्य आहे. गणवेश हा राष्ट्रसेवा आणि रक्षणासाठी आहे, कोणताही स्वार्थ साधण्यासाठी नाही. प्रत्येक दिवस संघर्षाचा आहे पण प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले, तर त्याचे नक्कीच समाधान मिळेल असेही कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले. कर्तव्य बजावताना माणवी आयुष्य सुंदर करण्याकरिता सतत प्रयत्न केले पाहिजेत असाही सल्ला त्यांनी दिला.
यावेळी जळगाव पोलिस दलाचे सौरभ कोलले यांनी या दिमाखदार संचलनाचे नेतृत्व पार पाडले. पोलिस निरीक्षक एस. बी. काळे व हवालदार दत्तात्रेय निकम यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य एच. पी. मुलाणी यांनी आभार मानले. विशाल जगताप, श्याम माने व सुनील निकम यांचा गुणानुक्रमे पहिले तीन अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून तर आकाश बिराजदार, महादेव गोयकर, सौरभ कोलले, सुनील चौधरी व संदेश बैसाणे यांना विविध गटांमधील कामगिरीसाठी प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आला.