Site icon Aapli Baramati News

निराधार महिलेकडून व्याजापोटी उकळले आठ लाख रुपये; पुण्यातील धक्कादायक घटना

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी 

पुणे महानगरपालिकेतील सफाई विभागातील कर्मचाऱ्याने व्याजापोटी आठ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी दिलीप विजय वाघमारे (वय ५२ वर्ष, रा. गंज पेठ) या सावकाराला अटक केली आहे.

पुण्यातील एक ७० वर्षीय ज्येष्ठ महिला महापालिकेतून सफाई कामगार म्हणून निवृत्त झाली आहे. काही वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. सफाई कामगार असताना त्यांची ओळख वाघमारे यांच्याशी झाली. पाच वर्षांपूर्वी या ज्येष्ठ महिलेने नातीच्या उपचारासाठी या सावकाराकडून ४० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी या सावकाराला मुद्दल ४० हजार आणि १ लाख रुपयांचे व्याज परत केले होते. तरीदेखील या सावकाराचे मन भरले नाही. 

या सावकाराने स्वतःकडे या महिलेचे पासबुक आणि एटीएम कार्ड ठेवून घेतले.  दर महिन्याला येणारी पेन्शनची रक्कम तो काढून घेऊन ज्येष्ठ महिलेला फक्त दीड हजार रुपये देत होता. एवढ्या पैशावर ज्येष्ठ महिलेचा उदरनिर्वाह होत नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर भिक मागण्याची वेळ आली.

सारसबागेसमोर त्या काही दिवसांपूर्वी भीक मागत होत्या. एका भाविकाने विचारपूस केली असता ही बाब लक्षात आली. भाविकाने संबंधित महिलेला खडक पोलिस ठाण्यात नेले. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. त्यानुसार पोलिसांनी सावकाराविरोधात फिर्याद दाखल करुन घेत गुन्हा दाखल केला. या सावकाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version