मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात नितेश राणे सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने ३१ डिसेंबर रोजी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने १३ जानेवारी रोजी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतिम निकाल राखीव ठेवला होता. न्यायालयाने आज निकाल देत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच नितेश राणे यांच्यावर साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा या अटी घालण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारावेळी १८ डिसेंबर रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर राणे यांच्या समर्थकांनी हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. तसेच या हल्ल्याच्या कटात नितेश राणे मुख्य सूत्रधार असल्याचे संतोष परब यांनी आरोप केला. या आरोपानंतर नितेश राणे काही दिवस गायब होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यावेळी स्वागताच्या निमित्ताने नितेश राणे माध्यमांसमोर आले होते.