
देगलूर : प्रतिनिधी
देगलूर विधानसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळ्या पक्षांच्या प्रचाराची जय्यत तयारी चालू आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारसभेत ‘मला फडणवीसांची जिरवायची होती. ती मी जीरवली आहे. त्यांची आणखीन जिरवणार आहे , असे मला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
देगलूर मतदारसंघात झालेल्या या प्रचार सभेत वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस असे भाजपामध्ये दोन टोक आहेत . दोघांचेही एकमेकांशी जमत नाही. दोघांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. देवेंद्र फडणवीस यांची मला जिरवायची होती. मी फडणवीसांची जिरवली सुद्धा आहे आणि आणखीन जिरवणार आहे, असे गडकरी एकदा मला म्हणाले होते असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी विजय वडेट्टीवार यांचा हा दावा खोडला आहे. गडकरी यांनी म्हटले आहे की, मी कोणतीही गोष्ट कधीच गुपचूप सांगितलेली नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांनी अशी बेजबाबदार वक्तव्य करून राजकारणात खोडसाळपणा करू नये. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे, ही कॉंग्रेसची परंपरा आहे. यामुळे आमच्या बाबतीतही काँग्रेसचे मंत्री असा संभ्रम निर्माण करू शकतात, असे गडकरी यांनी म्हटले आहे.