मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची पूर्व व्यवस्थापक दिशा सालियनची आत्महत्या नाही. तिच्यावर बलात्कार करून हत्या केली असल्याचे विधान केले होते. यासंदर्भात राज्य महिला आयोगाने मालवणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून नारायण राणे यांनी दिशा सालियनबद्दल केलेल्या वक्तव्याची तपासणी करण्याची मागणी केली होती. किशोरी पेडणेकर यांनी पत्रात म्हटले की, दिशा सालियनच्या मृत्यूचा सीबीआय तपास झालेला आहे. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोणतीच गोष्ट घडली नसल्याचे तिच्या शवविच्छेदनातून दिसते.
नारायण राणे यांनी दिशा सालियनची हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे. ही ही बाब अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. तिच्या मृत्युनंतरही बदनामी केली जात आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.