
सांगली : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना एका कार्यक्रमासाठी पोहोचण्यास उशीर झाला. यावरून जयंत पाटील यांनी धनुष्यबाण आणि हाताच्या नादाला लागून आता तर घड्याळ्याची वेळही चुकू लागली आहे असे म्हणत जोरदार टोलेबाजी केली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जयंत पाटील यांच्या हस्ते स्व. गुलाबराव पाटील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मंत्री लोक स्वतःचीच जिल्हा बँकेच्या संचालकपदी वर्णी लावून घेत आहेत. हे चुकीचे आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, अशा शब्दात जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेवर संचालक झालेल्या मंत्र्यांना कानपिचक्या लावल्या. त्यामुळे जयंत पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे होता याबद्दल कार्यक्रमस्थळी चांगलीच चर्चा रंगली.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांना द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. पिक विमा कंपनीचे असलेले निकष आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामध्ये ताळेबंद बसत नाही. त्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज वसुलीमध्ये जिल्हा बँकेने सवलत द्यायला हवी, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सूचित केले.