आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

धनंजय मुंडेंचा संकल्प सत्यात; पालावरच्या हजारो मुलांना मिळतेय मोफत शिक्षण..!

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

ना शाळा ना भिंती, सामाजिक न्याय विभागाचे शिक्षक देताहेत पालावर जाऊन ज्ञानाचे धडे…

बीड : प्रतिनिधी 

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा सामाजिक न्याय विभागाने पालावर राहणाऱ्या, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या अशा पालकांच्या मुलांसाठी ‘मिशन डायरेक्ट ऍडमिशन ही संकल्पना राबवून, यांतर्गत हजारो मुलांना समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षणाची या मुलांकडे सोय होऊ शकत नसल्याने सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील शिक्षक थेट या पालांवर जाऊन या बालकांना शालेय शिक्षण देत आहेत.

पाल, वीट भट्टी, आदी ठिकाणी जाऊन कोणत्याही भिंती, शाळा हे बंधन तोडून ही मुले जागा मिळेल तिथे, अगदी मंदिरात, खुल्या मैदानात ज्ञानार्जन करत आहेत. धनंजय मुंडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील महिन्यात समाज कल्याण विभागाने मिशन डायरेक्ट ऍडमिशन राबवून समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये हजारो मुलांचे पाल-वस्त्यांवर जाऊन प्रवेश निश्चित केले, परंतु सध्या शाळा बंद आहेत. तर दुसरीकडे या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय करणेही जिकिरीचे आहे. याचाच विचार करून मंत्री महोदयांच्या संकल्पनेचा विस्तार करत आश्रम शाळेतील शिक्षक या पाल-वस्त्यांवर जाऊन बालकांना शिक्षण देत आहेत. पुढे विभागाच्या आश्रम शाळा सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. तसेच जिल्ह्यात आणखी अशी मुले कुठेही शिक्षणापासून वंचित असतील तर बीड जिल्हा सामाजिक न्याय भवन येथे संपर्क करून माहिती द्यावी, त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी माहिती सा.न्या.चे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.

५३०० मुलांना प्रवेश..!

मिशन डायरेक्ट ऍडमिशन अभियानातून सुमारे ५३०० मुलांना  प्रवेश देण्यात आला असून यांपैकी ३००० मुलांना पाल-वस्त्यांवर जाऊन शिक्षण देणे सुरू झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांनाही शिक्षण प्रवाहात सामील करण्यात येत आहे


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us