Site icon Aapli Baramati News

धक्कादायक : पब्जीचा नाद ठरला जीवघेणा; झोपेच्या गोळ्यांच्या ओव्हर डोसने तरुणाचा मृत्यू

ह्याचा प्रसार करा

पालघर : प्रतिनिधी

अलीकडील काळात लहान मुलांपासून तरुणाईमध्ये पब्जी या गेमचं आकर्षण वाढलं आहे. त्यातून अनेक दुर्घटना घडलेल्या असतानाच पब्जीच्या नादापायी विरारमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातत्याने पब्जी खेळल्यामुळे निद्रानाशाचा आजार जडलेल्या दीपक दौडे या युवकाने झोपेच्या गोळ्यांची अतिरिक्त मात्रा घेतली. त्यातून त्याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दीपकला गेल्या दोन वर्षापासून पब्जी गेमचे व्यसन लागले होते. रात्रंदिवस पब्जी गेममध्ये रामणाऱ्या दीपकचे मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळले होते. त्यातूनच त्याला निद्रानाशाचा आजार जडला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गोरेगावमधील गोकुळधाम सेंटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

उपचार सुरू झाल्यानंतर त्याला घरीही सोडण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात  झोप लागावी यासाठी दीपकने नियमित मात्रेपेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिकच बिघाड झाला. त्याला उपचारासाठी कांदिवलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत कांदिवली पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version