आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक : धावत्या रेल्वेत दरोडेखोरांकडून युवतीवर सामूहिक बलात्कार

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

धावत्या ट्रेनमध्येच एका २० वर्षीय तरुणीवर दरोडेखोरांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दिवसेंदिवस अत्याचार आणि बलात्काराच्या घटना देशाबरोबरीनेच राज्यातही वाढत आहेत. एकीकडे मुंबई आणि उपनगरातील बलात्काराची प्रकरणं ताजे असताना लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस रेल्वेमध्ये कसारा घाटातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रेल्वेतील १५ ते २० प्रवाशांना मारहाण करून लुटमार करत दरोडेखोरांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर शुक्रवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. काही धाडसी प्रवाशांनी एका दरोडेखोराला पकडून ठेवल्याने अन्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

आरोपींनी प्रवाशांकडून रोख रक्कमेसह किमती मुद्देमाल हिसकावून घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. प्रवाशांना लुटल्यानंतर दरोडेखोरांची नजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर पडली.  यानंतर नराधमांनी २० वर्षीय तरुणीसोबत जबरदस्ती करत धावत्या ट्रेनमध्येच तिच्यावर बलात्कार केला. नाशिक नजिक असलेल्या घोटी परिसरातील हे आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. तर एक आरोपी मुंबई येथील असल्याचे तपासात उघड झाले आहे.

घोटी येथे लांब पल्ल्याच्या आणि एक्स्प्रेस रेल्वे थांबत नसल्याने अनेक लोक हे इगतपुरी येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. आरोपी देखील इगतपुरी येथून लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बसले होते. कसारा येथे एक्स्प्रेस थांबत नसल्याचे माहित असल्यानेच या आरोपींनी कसारा घाट ते कल्याण या दरम्यान लुटमार आणि बलात्कार केल्याचे बोलले जात आहे. यातील काही आरोपींनी नशेच्या अंमलाखाली असल्याचे सांगितले जात आहे.

कल्याण स्टेशन आल्यावर यातील काही आरोपी पळून गेले. पण एका आरोपीला धाडसी प्रवाशांनी पकडून ठेवले होते. तसेच आरडाओरड केल्याने रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या आरोपीला पकडून, त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपींना अटक केली आहे. पोलिस रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us