इंदापूर : प्रतिनिधी
अनेक शाळेतील मुलांना क्रिडा विषय प्रचंड आवडतो. खेळायला मिळावे यासाठी मुले हट्ट करतात. मात्र, इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर क्रिडा संकुलाच्या मैदानावर खेळून झाल्यावर दोन मित्र हात-पाय धुण्यासाठी शेततळ्यावर गेल्यानंतर तळ्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
मृत मुलाचे वडिल डाळिंबाच्या मार्केटमध्ये काम करतात. तर आई सोनाई डेअरीवर काम करते. ते खुद्द लातूर जिल्ह्यातील आहेत. मृत मुलाचे नाव आर्यन मच्छींद्र नाथजोगी (वय १० वर्षे, सरस्वतीनगर , इंदापूर) आहे. आर्यन चौथीत शिकत होता. क्रिडा संकुलाच्या इनडोअर टेनिस कोर्टच्या मागील बाजूस असणाऱ्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी ८वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. २० सप्टेंबरला आर्यनच्या कुटुंबीयांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशीस सुरुवात केली.
पोलिसांना आर्यनच्या मित्रांकडून त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र, वेळ निघून गेलेली होती. पोलिसांच्या हाती आर्यनचा मृतदेहच लागला. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.