तेलंगणा राज्य निर्मितीसाठी शरद पवार यांनी दिला होता पाठिंबा
मुंबई : प्रतिनिधी
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तर त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्य बनवण्यासाठी झालेल्या आंदोलनाला शरद पवार यांनी होता,असे सांगितले.
के. चंद्रशेखर राव म्हणाले, तेलंगणा स्वतंत्र राज्य बनवण्यासाठी जे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आपल्या देशामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामानाने विकास दर खूप कमी झाला आहे, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.
सध्या देशामध्ये खूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. या अनुषंगाने आज शरद पवार यांची भेट घेतली. देशातील जनता विरोधी पक्षांकडे खूप आशेने पाहत आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येत नवीन अजेंडा तुमच्या समोर घेऊन येऊ. एकत्र येण्याचे विचारच मी शरद पवारांना समोर मांडले आहेत, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.