मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बनावट नोटांचे रॅकेट चालवले आहे. तसेच नोटबंदीनंतर फडणवीसांनी बनावट नोटा छापणाऱ्यांना अभय दिला आहे. फडणवीस यांच्या काळात कुख्यात गुंडांना महामंडळाचे अध्यक्षपदही देण्यात आले आहे. त्यांचा दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी फडणवीस यांचा थेट संबंध होता. इतकेच नव्हे तर फडणवीस यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमातही दाऊदच्या हस्तकला थेट प्रवेश दिला जात होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काल देवेंद्र फडणवीसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या माणसाकडून नवाब मलिक यांनी कवडीमोल दराने जमीन विकत घेतली असल्याचा आरोप केला होता. यावरही नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यावेळी जमिनीचे व्यवहार झाले आहेत. त्यावेळी मी मंत्री नव्हतो. मी जी लढाई लढत आहे. त्या लढाईवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असल्याचे मलिक यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आणि समीर वानखेडे यांचे फार जूने संबंध आहेत. मुंबईमध्ये एक अधिकारी तब्बल १४ वर्षापासून नियुक्तीला आहे. तो अधिकारी त्याच्या सोयीनुसार पदांवर काम करत आहे, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे असे सांगून नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी विरोधी पक्षाकडून तथ्यहीन आरोप केले जात असल्याचे नमूद केले.
नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असे फडणवीस सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना जे मोठे गुंड आहेत त्यांना महामंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले. नागपुरमधील खूनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मुन्ना यादव नावाच्या व्यक्तीला एका शासकीय महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मुन्ना यादव तुमच्या गंगेत आल्यावर पवित्र झाल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.