सांगली : प्रतिनिधी
बापच मुलाचा वैरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात कुची या गावांमध्ये बापाने विहिरीतील पाण्याच्या मोटारीची दोरी कशासाठी आणली या कारणावरून मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.
हनुमंत वसंत माळी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात वसंत रामू माळी आणि मोठा भाऊ मारुती वसंत माळी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हनुमंत माळी याला दारूचे व्यसन होते. तो शनिवारी साडेबाराच्या सुमारास दारू पिऊन घरी आला होता. त्यादरम्यान, मारुती यांच्या विहिरीतील पाण्याची दोरी का सोडून आणली यावरून वसंत माळी आणि हनुमंत माळी यांच्यात वाद चालू होता. त्यांचे वाद सोडण्यासाठी मारुती माळी हा पुढे आला. मात्र त्यालाही हनुमंतने शिवीगाळ केली. त्यामुळे मारुतीने हनुमंतला हाताने मारहाण केली.
वडील वसंत माळी यांनी हनुमंतला काठीने मारहाण करत जमिनीवर पाडले. नंतर डोक्यात दगडाने मारहाण करत हनुमंतला जखमी केले. त्या मारहाणीत हनुमंतचा जागेवरच मृत्यू झाला. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. मयत हनुमंतची आई सुभद्रा माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.