पंढरपूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे आज वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. सोलापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तब्बल ५४ वर्षे त्यांनी सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक स्थिती असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
शेतकरी कामगार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तब्बल ११ वेळा प्रतिनिधित्व केले होते. आ
बासाहेब या नावाने ते परिचित होते. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १९२६ रोजी झाला होता. महाराष्ट्रात विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलेले नेते म्हणून त्यांचा लौकीक होता.
गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. त्यांनी पहिल्यांदा १९६२ मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांचा केवळ दोनदाच पराभव झाला. १९७२ आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते सलग आमदार राहिले. १९७२ च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी ते त्यानंतर झालेल्या १९७४ च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.