कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार चालू होते. ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
चंद्रकांत जाधव यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले.
चंद्रकांत जाधव यांचा अनेक तालीम मंडळीची फुटबॉल आणि सामाजिक कामांमुळे मोठा जनसंपर्क होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार असलेले शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
शांत आणि मितभाषी आणि मोठे यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची राज्यात मोठी ओळख होती.चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
आमदार चंद्रकांत जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. दिवंगत चंद्रकांत जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..’