मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. “ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रत्येक अभिनेत्याचं ‘दिलीपकुमार’ बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते, पद्मविभूषण दिलीपकुमार यांचं स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.