Site icon Aapli Baramati News

‘त्या’ कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येत नाही; शरद पवार यांनी सांगितलं कारण..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रात्री झोप न येण्याचे कारण सांगितले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोतीलाल राठोड या कवीचा आणि त्याच्या ‘पाथरवट’ या कवितेचा उल्लेख केला. समाजातील अन्याय-अत्याचाराच्या घटनेनं जो व्यथित होतो, तोच खरा कार्यकर्ता असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

मोतीलाल राठोड हा कवी बंजारा समाजाचा विद्यार्थी आहे. शरद पवार यांनी त्याला सहज विचारलं की तू काय करतो तर त्यावर त्याने उत्तर दिले की मी तुमच्या सगळयांविरुद्ध विचार करतो. आणि त्याने ‘पाथरवट’ ही कविता ऐकवली.  अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येत नाही आणि सतत आपण गुन्हेगार  आहोत असे वाटत राहते.

त्या कवितेत त्याने सांगितले, एक मोठा दगड आम्ही घेतो, आमच्या घामाने, कष्टाने, हातातील छन्नीने आणि हातोड्याने त्या दगडाचे मूर्तीत रूपांतर करतो. त्यानंतर सगळं गाव येतं आणि वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापीत करतो.नंतर पुढे माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही, अशा घामाने मुर्ती तयार झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही.  ती मूर्ती तुमचा बाप झाल्याचे प्रतीक आहे, पण तिचा बापजादा मी आहे. असे असताना त्या मंदीरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे, ही या मागची भावना असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले.

अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येत नाही. आपण स्वतः गुन्हेगार असल्याची भावना निर्माण होते असे सांगून शरद पवार म्हणाले, समाजातील उपेक्षित, वंचितांवर जे अन्याय झाले ते दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आज गरजेचे आहे. अशा कविता ऐकल्यावर जो अस्वस्थ होतो तो पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version