Site icon Aapli Baramati News

तेल टाकून आग भडकवण्याची भाजपची भूमिका : शरद पवार यांची टीका

ह्याचा प्रसार करा

गडचिरोली : प्रतिनिधी

आगीत तेल टाकून आग जास्त भडकवण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे,अशी  घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.  त्रिपुरा येथे घडलेल्या कथित घटनेचे अमरावती शहरात पडसाद उमटले.  त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.  गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे शेतकरी आणि शेतमजूर यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. देशामध्ये सध्या जातीवादाला खतपाणी घातले जात आहे. माणसा-माणसांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले जात आहे.  जातिवाद पसरवणाऱ्या शक्तींना खड्यासारखे बाजूला करून ठेवायला  पाहिजे ते आपले कर्तव्य असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, भाजपची भूमिका ही तेल टाकून आग जास्तच भडकवण्याची आहे. त्यामुळे आता या नितीला वेळीच रोखणे आवश्यक आहे.

नियमित  कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यायला हवा. वेळप्रसंगी शासनाने कर्ज काढायला हवे . शेतकऱ्यांना मदत करायला हवी असे नमूद करून शरद पवार म्हणाले, आगामी  होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्‍न संसदेत मांडणार आहोत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर देशभर केंद्र सरकारविरोधात मोर्चा काढणार आहोत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version