
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचीच अजितदादांनी फिरकी घेतली. तू ज्या चॅनलमध्ये काम करतो, तिथे तुला चीफ एडिटर व्हावंसं वाटत नाही का..? अशी गुगली टाकताच सभागृहात एकच हशा पिकला.
कोल्हापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला ठोस उपाययोजना राबावण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजितदादांनी या पत्रकाराची चांगलीच फिरकी घेतली.
प्रत्येकानं स्वप्न पाहणं हा काही गुन्हा नाही, आघाडी असली तरी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. बाकी निवडणुका कोणासोबत लढवायच्या हा संबंधित पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेतात. राष्ट्रवादीने कोणासोबत निवडणूक लढवायची यांचा निर्णय पवारसाहेब घेतात, कॉँग्रेसबाबत सोनिया गांधी निर्णय घेतात. तर शिवसेनेबद्दल उद्धव ठाकरे हे निर्णय घेतात. त्यामुळे आघाडीबद्दल काहीही चर्चा झाली तरी अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतात असे उत्तर देतानाच तू ज्या चॅनलमध्ये काम करतो, तिथे तुला चीफ एडिटर व्हावं असं वाटत नाही का..? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.