
पुणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत असताना एका व्यक्तीने मराठा आरक्षणावरून अडथळा आणला. तेव्हा त्यावरून अजित पवारच चांगलेच संतापले. तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आला आहे का? असा संतप्त सवाल त्या व्यक्तीला उपस्थीत केला.
अजित पवार कार्यक्रम सभेत बोलण्यासाठी उभे राहिल्यावर प्रेक्षकांमधून एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका मागणी काढण्याची मागणी केली. अजित पवार यांनी त्या व्यक्तीला खाली बसायला बसण्यास सांगितले. नंतर त्या व्यक्तीने पुन्हा त्यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यावरून अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले. तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आला आहे का? आज शिवजयंती आहे, असे चालणार नाही, असे पवार त्या व्यक्तीला म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, आरक्षण मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हीसुद्धा मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हाला काय जातीचा अभिमान नाही का? सगळ्यांना पुढे घेऊन जायचे असे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. न्यायालयात आरक्षण अडकले आहे. जर नियमात बदल करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर केंद्र सरकारकडून नियमात बदल करावा लागेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गडावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.