पुणे : प्रतिनिधी
एका डाॅक्टर महिलेला सोसायटीच्या अध्यक्षाने चुकीच्या कामाबद्दल नोटीस पाठवली आणि पुढे जे झाले ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. रागाच्या भरात डॉक्टर महिलेने खूप भयानक पद्धतीने बदला घेतला आहे. या डॉक्टर महिलेने अशी शक्कल लढवली की सोसायटीच्या अध्यक्षाला चांगलंच महागात पडलं. पण पुढे हेच प्रकरण या डॉक्टर महिलेच्या अंगलट आलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३७ वर्षीय महिला मनोविकारतज्ज्ञ आहे. एकाच सोसायटीत राहणाऱ्या अध्यक्षाने या महिलेला चुकीचे काम केल्याच्या दोन ते तीन नोटीस पाठवल्या. त्यामुळे या महिला डॉक्टरने या सोसायटी अध्यक्षाचा बदला घेण्याचा प्लॅन केला.
या महीलेने इंस्टाग्रामवर अध्यक्षांच्या नावाने फेक अकाउंट काढले. आणि अज्ञात महिलेला मेसेज करण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही मला प्रायव्हेटमध्ये भेटा, तुमच्याकडे एक काम आहे’ असा आक्षेपार्ह मेसेज केला. सोसायटीच्या चेअरमनने अशाप्रकारचा मेसेज केला म्हणून संबंधित महिला सोसायटीच्या चेअरमनवर भडकली आणि तिने सर्वांसमोर फिर्यादीला जाब विचारला.
या प्रकारामुळे सोसायटीच्या अध्यक्षांनी थेट कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, संबंधित प्रकार सोसायटीत राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेनं केल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.