
पुणे : प्रतिनिधी
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या काल (दि. ५) जम्बो कोविड सेंटरची तक्रार दाखल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत गेले होते. मात्र तेथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या झटापटीत त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच किरीट सोमय्या पुन्हा व्हीलचेअरवर बसून थेट महापालिकेत दाखल झाले.
काल किरीट सोमय्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून आज सकाळी डिस्चार्ज मिळताच हाताला बँडेज लावलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवर बसून किरीट सोमय्या थेट पुणे महापालिकेत पोहोचले. काल घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या झेड सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांनी कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर ते लगेचच तेथून निघून गेले.
दरम्यान, किरीट सोमय्या जम्बो कविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी तक्रार देण्यासाठी महापालिकेत आले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर ते शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे निघाले असता महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्यांच्यात झटापटी झाली. यामध्ये किरीट सोमय्या पायऱ्यावर पडले. दुखापत झाल्यामुळे किरीट सोमय्या यांना संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.