Site icon Aapli Baramati News

चित्रा वाघ म्हणतात; अजितदादा, तुम्हीच हा विषय तडीस नेऊ शकता..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळाने आक्रमक भूमिका घेऊन मंगळवारी ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच पगार कपातीची कारवाई केली जाण्याचीही शक्यता आहे.  त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार की पेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवत या विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

चित्रा वाघ आपल्या पत्रात म्हणतात, आपल्याला माहीत आहे की गेली ५ दिवस झाले एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरू आहे. पण या प्रकरणाची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत.

एसटी विलिनीकऱणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट पुढे केली जातेय. सुमारे 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. त्यांची मुलं पोरकी झालीत. पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरुन येणार…? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का…? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्या पुढे म्हणतात, दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आताही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्षपदी काम केलेल्या चित्रा वाघ यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपकडून प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. मात्र आता एसटी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीत या विषयावर तोडगा काढण्याची विंनती केली आहे. त्यामुळे आता अजितदादा आपल्या पूर्वाश्रमीच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्राला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.    


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version