मुंबई : प्रतिनिधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत जाणार की कॉंग्रेससोबत याची सध्या काही लोकांना फार चिंता वाटत आहे. मात्र जे स्वत:ला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे पवारसाहेब हे चाणक्य आहेत, अशा शब्दांत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी त्यांनी कोणत्याही पक्षाला बाहेर काढून आघाडी होणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. यासारखीच परिस्थितीत आगामी काळात देशाच्या राजकारणात पाहायला मिळेल असे सांगून नवाब मलिक म्हणाले, अनेक लोक असतात, जे सोबत येणार आहेत याची चर्चा होत नाही. मात्र सर्वच विरोधकांना एकत्र आणण्याचे काम शरद पवार करत आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला वगळून आघाडी होणार नसून त्या अनुषंगानेच शरद पवार यांची वाटचाल सुरू आहे.
देशामध्ये ममता बॅनर्जी यांच्यासह टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची एकत्रित मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. त्यासाठी सामूहिक नेतृत्व निश्चित करून या आघाडीचे कामकाज केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.