सातारा : प्रतिनिधी
राज्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोटाला धरूनच भाजप मोठी झाली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी नैराश्यातून बोलणे टाळावे; नाहीतर गावागावात शिवसैनिकांकडून समाचार घेतला जाईल, असा सूचक इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विनाधार व्यक्तव्य करणे चुकीचे आहे. जर चंद्रकांत पाटील माझ्या जिल्ह्यात येवून शिवसेनेवर टीका करत असतील तर हे कदापि खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा देसाई यांनी दिला. भाजपकडून सरकार पाडण्यासाठी तारखा सांगितल्या जात आहेत. कधी दोन महिन्याच्या तारखा दिल्या जातात. कधी दोन वर्षाच्या, मात्र आमचे नेते उद्धव ठाकरे हे अभ्यासू आणि कणखर आहेत. अनेक संकटे आली, मात्र त्या संकटाचा त्यांनी धीराने सामना केल्याचे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
सुरुवातीला तुमच्या पक्षाचे केवळ दोनच खासदार होते. त्यावेळी इतर पक्षासोबत जवळीक साधून सरकार तयार केले होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे आता नाहीत. त्यांनी राज्यात भाजपा वाढवण्यासाठी मेहनत घेतली आहे. सध्या लालकृष्ण अडवाणीसाहेब आहेत. चंद्रकांत पाटील यांनी त्यांना विचारावे की राज्यात गावपातळीवर भाजपा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोटलाच धरून वाढली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी नैराश्यातून शिवसेनेवर व्यक्तव्य करणे टाळावे. अन्यथा गावोगावचे शिवसैनिक त्यांचा समाचार घेतील, असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे.