Site icon Aapli Baramati News

चंद्रकांत दादा सध्या झोपेतही बोलतात, त्यांचं मनावर घेऊ नका : जयंत पाटील यांचा टोला

ह्याचा प्रसार करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

चंद्रकांत पाटील सध्या झोपेतही बोलतात असे कानावर पडले आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका. चंद्रकांत पाटील सध्या राज्य सरकारवर टीका करत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्याला जास्त महत्व देणे गरजेचे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

इतर सर्व पक्षात लोक धुतल्या तांदळासारखे आहेत.  भारताची लोकसंख्या १२० कोटी असूनही केंद्रीय तपास यंत्रणेला महाराष्ट्रातील लोक दिसतात. त्यातही  महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचेच लोक दिसतात, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, भाजपात गेल्याने शांत झोप लागते असे भाजपचे खासदार सांगत आहेत.  भाजपात आश्रय मिळतो. मात्र भाजपाच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांची १४ -१५ वर्षापूर्वींची कागदपत्रे बाहेर काढायची. त्यांच्यामागे चौकशी लावून द्यायची. त्यांच्यावर छापेमारी करायची आणि त्यांची बदनामी करायची, असे काम केंद्रीय तपास यंत्रणा करत आहे.  केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

समीर वानखेडे यांच्या विषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, अधिकाराच्या बाबतीत भाजपने ते गांभीर्याने घेणे गरजेचे नाही. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपावर समीर वानखेडे उत्तर देतील. राज्यातील माणसाला देखील समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल शंका निर्माण होईल. नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात दिलेल्या माहितीमुळे सर्व काही उघड झालेले आहे. या प्रकरणात समीर वानखेडे आणि नवाब मलिक आपली भूमिका मांडतील. भाजपने मध्ये पडून त्यांचा कार्यक्रम करण्याची गरज नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version