
मुंबई : प्रतिनिधी
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून रविवारी (१९सप्टेंबर) मुंबईत गणेश विसर्जन पार पडले. मुंबईतील गणेश विसर्जनादरम्यान वर्सोवा बीचवर ५ जण समुद्रात बुडाले. यातील दोन लोकांचे प्राण वाचवण्यात यक्ष आले आहे. मात्र तिघांचा शोध अद्यापही सुरू आहे. त्यांचे वय १८ ते २२ वर्षांच्या दरम्यान सांगितले जात आहे. हे सर्वजण वर्सोवा बीचजवळील गावातले रहिवासी आहेत. त्याच बरोबर पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्येही राहणार्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहराजवळील पिंपरी-चिंचवडच्या आळंदी रोड परिसरात रविवारी संध्याकाळी गणेश विसर्जनादरम्यान एक १८ वर्षीय तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एकाचा बुडून मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रज्वल काळे आहे. तर दत्ता ठोंबरे ( वय२०) याचा शोध सुरू आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास हे दोघे गणेश विसर्जनासाठी इंद्रायणी नदीवर गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि दोघेही पाण्यात बुडाले.
मुंबईत गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी गणपती आणि गौरीच्या तब्बल १९,७७९ हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. स्थानिक संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोविडमुळे, गणेश उत्सव सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत कडक निर्बंधाने साजरा करण्यात आला. गणपतीचा हा उत्सव १० सप्टेंबरला सुरू झाला. सहसा या वेळी मोठ्या संख्येने लोक जमतात आणि मंडळांच्या बाहेरही मोठ्या रांगा दिसतात. परंतु सलग दुसऱ्या कोविड साथीमुळे काही निर्बंधांदरम्यान हा उत्सव साजरा करण्यात आला.