मुंबई : प्रतिनिधी
त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये अमरावतीत झालेल्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. त्यानंतर भाजपकडून अमरावतीत बंद पाळण्यात आला होता. या बंद दरम्यानही हिंसाचार घडला. त्यावरून आता भाजपवर आरोप होवू लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाने पैसे वाटून दंगलीचा कट रचला होता. त्यातूनच अमरावतीत तेढ निर्माण झाल्याचे सांगत भाजपाचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे हे या कटाचे सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
नवाब मलिक यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. अमरावती , नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार घटना नियंत्रणात आल्या आहेत. हा हिंसाचार घडवणाऱ्या सर्व आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. राज्यामध्ये भाजपाचे दंगल घडवण्याचे सुनियोजित कट कारस्थान होते. भाजपने दंगल घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले होते असा आरोप त्यांनी केला. राज्यातील जनतेला भाजपची नीती लक्षात आल्यामुळे काही ठिकाणे वगळता अन्यत्र परिस्थिती नियंत्रणात राहिली. याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.
अमरावतीमध्ये बंद पुकारून संपूर्ण राज्यात दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र होते. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी हे षडयंत्र रचले होते. यासाठी भाजपकडून काही तरुणांना पैसा देण्यात आला होता. मुंबईतही अशा पद्धतीने पैशांचे वाटप करण्यात आले होते, असेही मलिक यांनी यावेळी सांगितले.
भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आत्तापर्यंत सर्व प्रकार वापरले गेले आहेत. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला. सगळे प्रकार वापरून झाल्यानंतर त्यांनी दंगलीचे हत्यार उपसले. मात्र तुम्ही आम्हाला पैशाच्या माध्यमातून पाडू शकत नाहीत, तुम्ही काही केले तरी आम्ही पाच वर्ष पूर्णच करणार आहोत असेही मलिक यांनी ठणकावले आहे.