दौंड : प्रतिनिधी
दौंड शहरातील मिशन हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या भिंती शेजारील कचरा कुंडीमध्ये प्लास्टिकच्या बरणीत एक स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत सापडले आहे. एकीकडे शासन स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पावले उचलत असतानाच दौंडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक शिंदे यांनी दौंड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. शहरातील मिशन हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या शेजारी कचराकुंडीत प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये तान्हे बाळ अढळल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित अर्भक ताब्यात घेतले.
दौंड शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हे अर्भक शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे हे या घटनेचा तपास करीत आहेत.