हिंगोली : प्रतिनिधी
राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नविन नियमावली जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात सुरु असलेला राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोलीत पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परभणीपासून ही यात्रा पुन्हा सुरु करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगाने ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. २४ जून रोजी या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठवाडा दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली अशा चार जिल्ह्यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवकाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह विविध मान्यवर या संवाद दौऱ्यात सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिट्या स्थापन करण्यासह संघटना मजबूत करण्यासाठी अधिक लक्ष देण्याचे आवाहन या दौऱ्यादरम्यान करण्यात आले. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासंदर्भात सुचना दिल्याचेही जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.