मुंबई : प्रतिनिधी
‘ओमीक्रॉन’ या नवीन कोरोना व्हायरसच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या काही दिवसांत देशांतर्गत विमान प्रवासासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. एक दिवसापूर्वी केंद्र सरकारने राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या SOP नुसार पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवीन नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंगळवारी रात्री जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने परदेशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी ७ दिवस होम क्वारंटाईन करणे अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या आगमनाच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशीही आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. जर ती व्यक्ती कोविडबाधित असल्याचे आढळून आले तर त्याला रुग्णालयात दाखल केले जाईल.
राज्य प्रशासन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा नवीन मसुदा तयार करत आहे. येत्या काही दिवसांत नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे नवे स्वरूप समोर येईल. केवळ देशांतर्गत हवाई प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे बदलली जातील. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे लागेल. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.