पुणे : प्रतिनिधी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने राज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक रंगतदार होईल असे वाटत असतानाच सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. कोणी कितीही उद्या मारल्या असत्या तरी सतेज पाटीलच निवडून येणार होते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांना सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल विचारले असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. कोणी कितीही उड्या मारल्या असत्या, कितीही मोठा आवाज केला असता, तरीही कोल्हापुरातून सतेज पाटील निवडून येणार होते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम बिनविरोध निवडीचा भाजपकडूनच प्रस्ताव आला होता. काही जागांवर भाजपला मोठा घोडेबाजार होण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांनी हा बिनविरोध देण्याचा प्रस्ताव ठेवला, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिले. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची मते जास्त आहेत. त्यामुळे सतेज पाटलांची बाजू क्लिअर होती. सतेज पाटील यांचा विजय होणार असल्याचे निश्चित होते, असे अजित पवार यांनी नमूद केले आहे.