सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या उदघाटन कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. विमानतळाचे उद्घाटनाचा क्षण आनंदाचा आहे. हा क्षण आदळाआपट करायचा नाही. मात्र कोकणातल्या मातीत आंब्याच्या झाडांसोबत बाभळीचेही झाडे उगवतात. हा दोष मातीचा नसतो.त्यामुळे कोणी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग येथील चीपी विमानतळाचा लोकार्पण उद्घाटन सोहळा आज पार पडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाला सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत. काही लोक पाठांतर करून बोलत आहेत. मात्र अनुभवाने बोलणे वेगळे असते. मनातील खदखद व्यक्त करणे, हे त्यापेक्षा ही वेगळी असते. आज इतका चांगला क्षण आहे. अशा चांगल्या क्षणाला गालबोट लागू नये म्हणून एखादे काळे तिट लागते. अशाच प्रकारची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना नाव न घेता टोला लगावला.
नारायण राणे यांनी कोकणाच्या विकासाचा शिलेदार आपणच असल्याचा दावा यांनी केला होता. अनेक कामे आपल्यामुळे मार्गी लागल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. सिंधुदुर्गचा किल्ला महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणीतरी म्हणेल की हा किल्लाही आपणच बांधला, अशा शब्दांत त्यांनी नारायण राणेंच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला.
मी विकास कामाच्या बाबतीत पक्षभेद करत नाही, असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, नारायण राणे यांच्या आठवणीत नसेल. त्यांनी मातोश्रीवर वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन फोन केले होते. दुसरा फोन केला त्या क्षणीच मी त्या फाईलवर सही केली होती. कारण हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे. जनतेच्या भल्यासाठी आहे आणि अशा कामात आपण कधीही राजकारण करणार नाही.