पुणे : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका, दि मुस्लिम फाऊंडेशन व नॉलेज पार्क चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा खुर्द मिठानगर प्रभाग क्रमांक 27 येथील संत गाडगे महाराज शाळेत उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहातून ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार चेतन तुपे, नगरसेवक ॲड. अब्दुल गफुर अहमंद पठाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोंढवा खुर्द येथील कोविड सेंटर उभारणीकरीता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या कोविड सेंटरसाठी 30 खाटांची परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर, परिचारीका व औषधे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
कोरोनाच्या काळात डॉक्टर, पॅरामेडीकल स्टॉफ, पोलीस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदि चांगल्याप्रकारे काम करीत असून त्यांचे मनापासून आभार मानतो. घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी व नागरिक सहकार्य करत असून यापुढेही नागरिकांनी प्रशासनाला असेच सहकार्य करत कोरोना संसर्ग साखळी तोडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.