मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस नेते राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसकडून रजनी पाटील उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी उमेदवारी मिळवली होती. मात्र त्यांनी आज आपला अर्ज माघारी घेत निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस उमेदवार रजनी पाटील यांनी भाजपचे आभार मानले आहेत.
राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. ही विनंती भाजपने पूर्ण केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतून आज भाजपने संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची बिनविरोध निवड होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपने मोठा समजूतदारपणा दाखवला आहे. त्यांची मनापासुन आभारी आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर झालेल्या पोटनिडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. या बिनविरोध निवडणुकीची परंपरा काँग्रेसने जपली आहे. आज तीच परंपरा पाहायला मिळत आहे, असे रजनी पाटील यांनी नमूद केले.