Site icon Aapli Baramati News

केपी गोसावीचे व्हॉटस्ॲप चॅट नवाब मलिक यांनी ट्वीटरवर केले शेअर; पुन्हा एकदा समीर दाऊद वानखेडेंवर डागली तोफ…

ह्याचा प्रसार करा

काशिफ खान व व्हाईट दुबे यांना एनसीबी का वाचवत आहे…? काशिफ खान व समीर दाऊद वानखेडे यांचे काय संबंध आहेत याची माहिती एनसीबीने द्यावी… नवाब मालिकांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी

केपी गोसावी आणि दिल्लीतील खबरी यांच्यात क्रुझवर कुणाला चिन्हित करायचे याबाबतचे दोघांमधील व्हॉटस्ॲप चॅट ट्वीटरवर शेअर करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

क्रुझवर काशिफ खान चिन्हीत असताना त्याला का अटक करण्यात आली नाही शिवाय त्याच्यासोबत असणारा व्हाईट दुबे यालाही वगळण्यात का आले याचं उत्तर एनसीबीच्या समीर दाऊद वानखेडे याने द्यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी आज केली. दरम्यान, काशिफ खान व समीर दाऊद वानखेडे यांचे काय संबंध आहेत याची माहितीही एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी द्यावी असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

या व्हॉटस्ॲप चॅटमध्ये केपी गोसावीला खबरी काशिफ खान व व्हाईट दुबे यांची माहिती देत आहे. तर केपी गोसावी त्याला फोटो पाठवायला सांगत असून त्या खबरीने काशिफ खानचा फोटोही शेअर केला आहे. ज्या पध्दतीने फोटोच्या आधारावर लोकांना चिन्हीत करण्यात आले त्याचपध्दतीने काशिफ खान याला का चिन्हीत करण्यात आले नाही. तो दोन दिवस क्रुझवर असताना त्याला का वगळण्यात आले असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर दाऊद वानखेडे हा झोनल अधिकारी आहे आणि त्याच्या अखत्यारीत गोवा राज्य येते. जगभरातील लोकांना माहीत आहे की गोव्यात ड्रग्ज टुरीझम चालते. रशियन माफिया ड्रग्जचा धंदा करत आहेत. मात्र गोव्यात कारवाई होत नाही कारण काशिफ खानच्या माध्यमातून ड्रग्जचे रॅकेट चालते आणि समीर दाऊद वानखेडे व काशिफ खान यांचे घनिष्ट संबंध आहेत असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात चिन्हीत काशिफ खान याला चौकशीला का बोलावण्यात आले नाही. व्हाईट दुबे हा सुद्धा होता त्याचीही माहिती देण्यात आली होती. मग त्याला का अटक नाही असा जाबही नवाब मलिक यांनी एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना विचारला आहे.

काशिफ खानवर देशभरात वेगवेगळे गुन्हे आहेत. चारच दिवसापूर्वी मुंबईत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका कोर्टाने तर त्याला फरार घोषित केले आहे इतकं असताना काशिफ खानला का वाचवण्यात येत आहे याचं उत्तर एनसीबीने द्यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version