
मुंबई : प्रतिनिधी
आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पूर्ण जगाची झोप उडवली आहे. या नव्या ओमिक्रॉनचा प्रसार होऊ नये, यासाठी जगातील सगळे देश अधिक सतर्क झाले आहेत. त्यामुळे राज्यांनी देखील खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार राज्याने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र राज्याने जारी केलेल्या या नवीन मार्गदर्शक सूचनांवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवास यासंदर्भात केलेल्या नियमांवर आक्षेप नोंदवला आहे.
परदेशातून आलेल्या डोमेस्टिक प्रवाशांना ७२ तासांचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे. कोणत्याही देशातून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांना आरटीपीसी चाचणी करणे बंधनकारकच आहे. त्या प्रवाशांचा आरटीपीसी अहवाल निगेटिव्ह असला तरीसुद्धा त्यांना १४ दिवस गृह विलगीकरनात राहावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलागिकरनात आणि १४ दिवस गृह विलगीकरनात राहावे लागणार आहे, अशा नव्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेवर केंद्राने आक्षेप नोंदवला असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या सूचना आणि इतर राज्यांच्या सूचनांमध्ये साम्य आहे. राज्य सरकारने नवीन सुधारित सूचना जारी कराव्यात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.