मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय अन्वेषण विभाग, प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राज्यातील नेत्यांना त्रास देण्यासाठी होत आहे. त्यामुळे या केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल पक्षाच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. प्राप्तीकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांसह आणि निकटवर्तीयांवर छापेमारी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय, ईडी, सीआयडीकडून चौकशी चालू आहे. तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातही तक्रार केली आहे.
भाजपाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे घेतात. लगेच केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड टाकण्यात येते, अशी चर्चा या बैठकीदरम्यान झाली आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील मंत्री राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करतील. स्थानिक नेत्यांकडून आढावा घेतला जाईल. त्यानुसार अहवाल तयार करतील. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढायच्या की आघाडीकडून लढायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे.