
डोंबिवली : प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपकडून महाविकास आघाडीला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कमकुवत भूमिका मांडून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ओबीसी समाजाचं मोठं नुकसान केल्याची टीका त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी महिलांच्या कार्यक्रमात आयोजित शरद महोत्सवासाठी मंत्री जयंत पाटील आज डोंबिवलीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. प्रायोगिक डेटा ९८ टक्के बरोबर होता आणि नंतर केंद्र सरकारने न्यायालयात निवेदन सादर केले की त्यात अनेक त्रुटी आहेत. त्याचवेळी आता डेटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील ओबीसींचे मोठे नुकसान केल्याचे जयंत पाटील यांनी नमूद केले.
राज्य सरकार ओबीसी आरक्षण देण्यात कोणतीही कपात करणार नाही. मात्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अशी भूमिका जाणूनबुजून कमकुवत केली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशातही गेले आहे. उद्या तेच कर्नाटक आणि यूपीमध्ये होणार आहे, त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. भाजपची ही भूमिका अनाकलनीय असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.