मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने शिवसेना-राष्ट्रवादीतील नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता काँग्रेसकडे मोर्चा वळवला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे भ्रष्टाचाराचे घोटाळे उघडकीस आणणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावर काँग्रेसने लगेच आपली प्रतिक्रिया दिली असून अशा इशाऱ्यांना कॉँग्रेस घाबरत नाही अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कालपासून राज्यातील राजकीय वातावरण चिघळत आहे. अशातच पुन्हा चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसच्या दोन नेत्याचे घोटाळे उघडकीस आणणार असल्याचे जाहीर विधान केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानावर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजपाचे सरकार ब्लॅकमेलिंग करणारे आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला काँग्रेस घाबरत नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.