हिंगोली : प्रतिनिधी
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेचे उमेदवरी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव उद्या (मंगळवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या नावाला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सहमती दिली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी प्रज्ञा सातव यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, राजीव सातव यांच्या अकाली निधनाने त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र काँग्रेसकडून ऐनवेळी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते.
राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून सातव कुटुंबीयांचे राजकारणामध्ये पुनर्वसन करण्याच्या हालचाली चालू आहेत. पक्षाकडून प्रज्ञा सातव यांना राज्य कार्यकारणीमध्ये महत्त्वाचे स्थान देत प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
ऐनवेळी राज्यसभेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव नाकारल्यानंतर जिल्ह्यातील सातव गट मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता. मात्र कॉंग्रेसने विधान परिषदेसाठी सातव यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.