इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली असून २० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २२ ऑक्टोबरला या निवडणुकीची मतमोजणी पार पडेल. या कारखान्यावर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे ताकद लावतील का याकडेच तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यशवंत गिरी यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार २२ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असून २४ सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज भरता येणार आहे. अर्जाची छानणी प्रक्रिया २७ सप्टेंबर रोजी होणार असून २८ रोजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
तसेच २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारांना अर्ज परत मागे घेता येतील. १३ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप केले जाईल. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर मतमोजणी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ पासून सुरू होईल.