पुणे : प्रतिनिधी
पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओमीक्रॉनचे रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी नागरीकांनी घाबरून न जाता संयम बाळगून लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
पुणे शहरात एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये सहा असे एकूण सातजण ओमीक्रॉन बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेते पार्थ पवार यांनी नागरीकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात सातजणांना ओमीक्रॉनची बाधा झाली आहे. यामुळे घाबरून न जाता नागरीकांनी संयम बाळगावा. तसेच अधिकाधिक खबरदारी घ्यावी आणि लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण हाच यावर एकमेव मार्ग असून नागरीकांनी मनात शंका न बाळगता लसीकरण करावे, असे आवाहन पार्थ पवार यांनी या ट्विटमध्ये केले आहे.
मागील वर्षीपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले होते. या काळात मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा ओमीक्रॉनने चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी नागरीकांना संयम बाळगत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.