औरंगाबाद : प्रतिनिधी
औरंगाबाद शहरामध्ये शनिवारी रात्री तीन ठिकाणी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे आहे, अशा आशयाची बॅनर लावण्यात आले आहेत. त्यासोबतच जातीची कुठलीही अट नाही, असे त्या बॅनरच्या आशयामध्ये म्हटले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून; नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
रमेश विनायकराव पाटील असे हे बॅनर्स लावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्या बॅनरमध्ये म्हटले आहे की, मला तीन मुले असल्याने मी महानगरपालिकेची निवडणूक लढू शकत नाही. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. महिलेचे वय २५ ते ४० दरम्यान असावे. जातीची कुठलीही अट नाही. अविवाहित, घटस्फोटीत, विधवा महिला चालेल. मात्र महिलेला दोन अपत्ये असावीत. दोन पेक्षा अधिक अपत्ये असणारी महिला चालणार नाही.
या संदर्भात रमेश विनायकराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मात्र मला लॉकडाऊनमध्ये तिसरे अपत्य झाल्याने मी निवडणूक लढविण्यास पात्र नाही. समाजाचे प्रश्न मांडावे, असा माझा आग्रह आहे. त्यामुळे बायको मिळाली तर मी तिला निवडणुकीला उभे करणार आहे. या संदर्भात कुटुंबासोबत चर्चा केली आहे. बॅनर्स लावल्यापासून मला चार ते पाच फोन आलेले आहेत. दोन तीन दिवसानंतर आणखीन फोन आल्यानंतर मी विचार करून एका महिलेची पत्नी म्हणून निवड करणार आहे.