पुणे : प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी एसटी कामगारांचा संप अजूनही सुरूच आहे. कामगारांना वारंवार आवाहन करूनही त्यांनी संप मागे घेतला नाही. त्यामुळे एसटी बससेवा पूर्णपणे बंद झाली आहे. पुण्यातून ९० टक्के मार्गावरून एसटी बस सेवा अडीच महिन्यापासून ठप्प आहे. त्यामुळे खासगी वाहतुकदारांची चांदी झाली असून प्रवाशांना मात्र भुर्दंड सोसावा लागत आहे.
एसटी बसेस बंद असल्यामूळे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून सरकारने पुणे बस स्थानकातच खाजगी वाहनाना वाहतूक करण्याची परवानगी दिली. दररोज रस्त्यावरून कितीतरी खाजगी बसेस धावतात. लालपरीची जागा आता खाजगी बसेसनी घेतली आहे. या खाजगी बसेस स्वत:ची मनमानी करुन प्रवाशांकडून दुपटीने तिकिटाचे पैसे घेतात. प्रवाशांकडे खाजगी बसेसशिवाय पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव जादा पैसे मोजावे लागत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात २५० ते ३०० किलोमीटरवर खासगी बसेस चालू आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही स्थानकावर दाखल झालेल्या नाहीत. त्यासाठी खासगी बसच्या कार्यालयातून प्रवाशांकडून पैसे घेण्यात येतात. खासगी व्यावसायिकांच्या तिकिटांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे सध्या खाजगी वाहतूकदार जोमात अन् प्रवासी कोमात अशीच अवस्था निर्माण झाली आहे.